हैद्राबाद : आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी एका व्होल्वो बसला अचानक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेत किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ही व्होल्वो बस 40 जणांना घेऊन हैदराबादवरून बंगळुरूकडे जात होती अशी माहिती सांगितली जात आहे.
या घटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितलं की, एक मोटरसायकल बसला येऊन धडकली आणि अचानक बसला भीषण आग लागली. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांत बस जळून खाक झाली. जेव्हा मोटरसायकल आणि बसची धडक झाली तेव्हा बसच्या इंधनाची टाकी फुटली आणि त्यानंतर आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काय म्हटलं?
आंध्र प्रदेशातील कुर्नूलमधील बसच्या या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला धक्का बसला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. तसेच या घटनेत जखमी आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत सरकार करेल. टीडीपी आमदार लोकेश नारा यांनी म्हटलं की, कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.
जगन मोहन रेड्डींनी काय म्हटलं?
कुर्नूल बस दुर्दैवी घटनेबाबत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं की, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि वैद्यकीय मदत मिळावी अशी मी सरकारला विनंती करतो.
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दुःख झालं आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना ते लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये दिले जातील आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर (ट्विटर) दिली आहे.